महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू – पवार
केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी असून, दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करू, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली.महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले की, सध्या सोयाबीन तेल, कापसाच्या गठाणी आयात करण्याचे धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाचे भाव पडले असून, देशातील ५८ टक्के जनता शेती करते. परंतु देशाचे पंतप्रधान हे भांडवलदारांचे मित्र असल्याने त्यांना शेतकऱ्यांप्रती कळवळा नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली असून, शेतकऱ्यांनी उत्पादितकेलेल्या शेतीमालाच्या विक्रीतून उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.राज्यात सत्तेचा गैरवापर वाढला असून, गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चार वर्षांच्या मुलांपासून ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत कोणीही या राज्यात सुरक्षित नाही. दररोज अत्याचाराच्या, खुनाच्या घटना घडत आहेत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची भाषा, कार्य, त्यांचेपक्षांतर घडवून आणले जात आहे. भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पडला.ज्या पुतळ्याचे अनावरण देशाच्या पंतप्रधानांनी केले होते, तो पुतळा खाऱ्या वाऱ्यामुळे पडला, हे पचनी पडत नाही. असे जर झाले तर मग इंडिया गेट अजून का खाऱ्या वाऱ्यामुळे पडला नाही? हा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आली तर प्रत्येक महिलेस दरमहा ३ हजार रुपये, एसटी बसमध्ये मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, जातीनिहाय जनगणना करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणार, आजारी इसमास २५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत, याशिवाय आणखीही धोरणात्मक निर्णय राबवणार असून, मतदारांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचाहिंगणघाट (वर्धा) : शेतकरीविरोधी धोरण अवलंबणाऱ्या व तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलणाऱ्या विद्यमान महायुती सरकारला महाराष्ट्रात सत्तेत राहण्याचा आता अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून खाली खेचा व महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी हिंगणघाट येथील सभेत केले. राज्यात बेरोजगारी वाढलेली आहे. आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. आता मात्र महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे. येथे कष्ट करणाऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे राज्यातील युती सरकारला त्यांची योग्य जागा दाखवणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.