कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे – वैभव गिते
कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे वैभव गिते
खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणीप्रतिनिधी–कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे मार्च ते मे महिन्याच्या हंगामात हातावर पोट असलेले विविध घटक अडचणीत आले आहेत.यामध्ये शिव,फुले,शाहू आंबेडकर,आण्णा भाऊ यांच्या विचारांचा प्रसार प्रचार तळागळापर्यंत पोचवून अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारे हजारो गायक,शाहीर,जलसाकार तसेच मार्च,एप्रिल व मे महिन्यात गावागावांमध्ये होणाऱ्या जत्रा यात्रांमध्ये रसिक मायबाप जनतेचे मनोरंजन करणारे लावणी शो,ऑर्केस्ट्रा,तमाशा मंडळांसह अनेक कार्यक्रमातील कलाकारांचा समावेश आहे.
पायाला भिंगरी बांधून स्वतःचा संसार पाठीवर बांधून कलावंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संचासोबत जाऊन जनतेचे प्रबोधन व मनोरंजन करून मिळेल ते मानधन पदरात पाडून चटणी भाजी भाकरी खाऊन दिवस काढतात.याच मानधनावर कलावंत एक वर्षाचे गणित मांडतात उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण,औषधपाणी,देणी घेणी करतात.केंद्रसरकार व राज्यसरकार यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या रद्द केल्याने उपासमारीची वेळ आली आहे.तरीही महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेस पोवाड्याच्या माध्यमातून संदेश दिला आहे सध्या त्यांचा हा पोवाडा सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाला आहे.असे हे कलावंत स्वतःचे दुःख चेहऱ्यावर न दाखवता जनतेस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत
मुख्यमंत्री सहाययता निधीत सध्या 197 कोटी निधी शिल्लक आहेत.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून यामधील निधी कलावंतांना व त्यांच्या संचास तीन महिन्यांकरिता प्रत्येकी पाच
लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात यावेत यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही
कलाकारांपुढे खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली आहे.पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा परखड शब्दात सांगणाऱ्या व जपणाऱ्या या घटकांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये.कलाकारांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणे खुप गरजेचे आहे.तात्काळ निर्णय घेऊन कलावंतांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड थांबवावी ही विनंती