शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने दहिवडीत 10 एप्रिलला भव्य मोफत आरोग्य शिबिर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दहिवडी (ता. मान, जि. सातारा) येथे शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट पुणे आणि सेवासदन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी व उपचार मोफत करण्यात येणार असून, नागरिकांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. शिबिरात मोफत चष्मे वाटप, हृदयरोग तपासणी, ईसीजी, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध असतील. तसेच डोळ्यांशी संबंधित तिरळेपणा, बुबूळ प्रत्यारोपण, रेटिना व पापणी पडण्याचे आजार यांची तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
याशिवाय लघवी, किडनी, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित आजारांवर उपचार, मोफत रक्त तपासणी, मनका व मज्जातंतू विकारांवर शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया तसेच कॅन्सर तपासणी मोफत करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर आयडियल गणेश मंडळ, चावडी चौक, दहिवडी येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















