मातंग समाजातील मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास
मातंग समाजातील मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –एट्रोसिटी कायद्यानुसार आजन्म कारावास होण्याची पंढरपूर तालुक्यातील पहिलीच घटना आहे
मौजे नांदोरे ता. पंढरपूर जी.सोलापूर येथील अनुसूचित जातीच्या मातंग समाजातील मूकबधीर, मतीमंद व अपंग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या नांदोरे येथील नारायण भानुदास कदम(वय ५८ वर्षे) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.चकोर बावीस्कर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याने पीडितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३० सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी नारायण कदम याने घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यावेळी पीडितेची आजी घरी आल्यानंतर याप्रकरणी तिने कदम याला जाब विचारला असता तो पळून गेला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपूर तालुक्यासह माळशिरस तालुक्यात उमटले होते. त्यामुळे एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकासदादा धाईंजे, अॅड. सुमित सावंत, अॅड. सुजित निकाळजे, धनाजी शिवपालक, बाबासाहेब सोनवणे, संजय झेंडे, रवि झेंडे, प्रमोद शिंदे, संजय नवगिरे, समीर नवगिरे, प्रविण नलावडे, रवि बनसोडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पोलिस स्टेशन व डीवायएसपी यांना भेटून यांसदर्भात निवेदन दिले होते. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी व मनात चीड उत्पन्न करणारी असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन वैभव गीते यांनी ही बाब पद्मश्री सुधारकदादा ओलवे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा पद्मश्री सुधारकदादा ओलवे यांच्यासह जर्मनी व कुवैत या देशाच्या महिला पत्रकार यांनीही पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावी भेट देऊन कुटुंबाशी चर्चा केली होती. यादरम्यान अॅड. सुमित सावंत यांनी पीडित व साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रिया व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या होत्या. तर मातंग समाजाचे लढाऊ कार्यकर्ते धनाजी तुकाराम शिवपालक यांनी फिर्यादी व साक्षीदारांचे मनोबल वाढवून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामुळे पीडित व साक्षीदारांचे मनोबल वाढले होते. याप्रकरणात एनडीएमजेचे महासचिव डॉ. केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली व रमाताई अहिरे यांच्या नेतृत्वाखाली वैभव गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळे याप्रकरणी करकंब पोलिसांत आरोपीच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. तसेच तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयात विशेष खटला नंबर ७६/२०१६ नुसार कामकाज चालले. तेव्हा सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादी पीडितेची आजी, डॉ. आशा घोडके, डॉ. शंकर बोरकर, डॉ. संदीप कुमार, मूकबधीर शिक्षिका गायत्री जोशी, तपास अधिकारी पिंगळे व इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. दोन साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले. मात्र उलट तपासात सरकार पक्षाने घटनेबाबत आवश्यक बाबी न्यायालयासमोर आणल्या. तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. आरोपीचा बचाव व आलेला पुरावा याचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपी नारायण कदम याला दोषी धरून भादंवि ३७६(२) (जे)(एल) करिता दोषी धरून त्याच्या उर्वरित नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो आजन्म कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(२)(व्ही) करिताही त्याला आजन्म कारावास व ५ हजार रूपये द्रव्यदंड यासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(१)(डब्ल्यू)(१) करिता ५ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४ करिता आजन्म कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा अशी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे पीडितांसह एससी व एसटी समाजाकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. करकंब पोलिस ठाण्यातर्फे कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार संजय मंगेडकर हे कार्यरत होते.
चौकट:-
राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमाला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांचे अंतकरणापासून स्वागत. त्याचबरोबर एनडीएमजेच्या टीमने पीडितांना मदत करून त्यांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जातीयवाद्यांना व नराधम राक्षसांना एक मोठी चपराक बसल्याने भविष्यात ते एससी व एसटी समाजावर गुन्हे करण्यास धजावणार नाहीत.– विकासदादा धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय(आठवले)