गोंदवलेच्या वनराईला ठाण्याच्या इंजिनाने पाणी..

..

नववर्षाची भेट, रोहित-रक्षिता भावंडांसाठी 51 हजारांची मोठी मदत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे :
गोंदवले खुर्द येथील भावंडांनी पर्यावरण रक्षणासाठी डोक्यावरुन पाणी नेऊन वनराई फुलविली. झाडे मोठी झाल्याने त्यांना डोक्यावरून पाणी नेलेलं पुरेना, याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील श्री स्वामी समर्थ ट्रस्ट चे महेश कदम यांनी या भावंडांना तब्बल 51 हजार रुपयांची डिझेल इंजिन, पाईप देऊन नववर्षाची भेट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोंदवले खुर्द ची भावंडे रोहित बनसोडे व रक्षिता बनसोडे ही गेल्या तीन वर्षांपासून अखंडितपणे माणदेशी दुष्काळी भागात पर्यावरण रक्षणासाठी झुंज देत आहेत.

बोडक्या माळरानावर त्यांनी हजारो झाडांची वनराई साकारली आहे. झाडे लहान असताना पाणी डोक्यावर वाहून ती जगविली, पण आता झाडे भरपूर प्रमाणात लावल्याने त्यांना पाणी घालणे कठीण जात होते. ताकदीच्या आवाक्याबाहेर पाणी घातले जात होते. ही बाब लेखक अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून महेश कदम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी डिझेल इंजिन आणि पाईपलाईन घेण्यासाठी ही यंत्रसामग्री देऊन रोहित-रक्षिताला अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववर्षाचा मुहूर्त साधला
गोंदवले येथील रोहित आणि रक्षिता या भावंडांनी केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी महेश कदम यांनी नववर्षाचा मुहूर्त साधला. दोघांनी कष्टाने उभा केलेल्या वनराईत वेळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही कायमस्वरूपी मदत करण्याचे आश्वासन दिले. वनराई फुलवण्याचं या दोन्ही भावंडांचे काम इतरांसाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे, असे कदम म्हणाले.

माणदेशी मातीसाठी इथल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही झाडे लावून जगवत होतो. गेल्या तीन वर्षापासून आम्ही ज्या यातना, कळा सोसल्या त्या कदम यांच्या दातृत्वाने भरून पावलं आहे. भविष्यातही हिरवाई स्वप्न निरंतर ठेवू. – रक्षिता बनसोडे गोंदवले

You may have missed