राज्यात कृषी विभागाच्या वतीने पिक स्पर्धेचे आयोजन, कृषीअधिकाऱ्यांकडून स्पर्धेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2021 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून पीक स्पर्धेसाठी सहभागी व्हावे, पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके – भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके समाविष्ट आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क- सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी 300 रूपये रक्कम. अर्ज दाखल करण्याची तारीख – मूग व उडिद पीक – 31 जुलै. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल – 31 ऑगस्ट 2021 पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, 7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. तालुका पातळीवर पीकस्पर्धा विजेत्यांसाठी पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रूपये. जिल्हा पातळीवरील पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रूपये इतके तर विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार व तिसरे 15 हजार रूपये त्याचबरोबर कृषी राज्य पातळीवरील 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार रूपये इतके बक्षीस असेल. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडलकृषी आधिकारी नातेपुते श्री सतीश कचरे व कृषि पर्यवेक्षक  नातेपुते श्री उदयसिंह साळूंखे व श्री गोरख पांढरे व कार्यालयातर्फे करण्यात आले.

You may have missed