अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना वेळापूर पोलिसांकडून दोन तासात अटक
वेळापूर पोलीसांची दमदार कामगिरी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – ता. माळशिरस येथील वेळापूर पोलीस ठाण्यात १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्या नंतर वेळापूर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील तीनही आरोपींना दोन तासात इदांपूर येथून अटक करून दमदार कामगिरी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेळापूर पोलीस ठाण्यात दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,मौजे उघडेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी बलात्कार केल्याचा गुन्हा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.मात्र वेळापूर पोलिसांनी तातडीने आपली तपास यंत्रणा सुरू करून या आरोपींना अवघ्या दोन तासात बेड्या ठोकण्यात यश आले.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस फौजदार रेगुडे, पोलीस हवालदार जनार्दन करे ,पोलीस कॉन्टबेल नवनाथ थिटे, वाहन चालक पोलीस कॉन्टबेल विठ्ठल बंदुके यांच्या पथकाने सापळा रचून या तिनही आरोपींना गुन्हा दाखल झाले पासून अवघ्या दोन तासात इदांपूर येथून ताब्यात घेतले आहे.
उघडेवाडी येथील युवराज गोडसे,रणजित कोळेकर व रोहण दत्तात्रय भोसले, रा. खंडाळी या तरुणांविरुद्ध वेळापूर पोलिसांत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे ३७६ ,३६६ , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे ४ आणि ८ , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार) प्रतिबंधक १९८९ प्रमाणे ३(१)(w)(i) व ३(१)(w)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर तीनही आरोपींना पंढरपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ०३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.







