स्टेटसच्या दुनियेपलीकडचा माझा ‘बाप’: एक जिवंत आणि पवित्र सेवा पर्व..











आज ‘फादर्स डे’… सोशल मीडिया उघडला की प्रत्येक कोपऱ्यात वडिलांबद्दलच्या कविता, फोटो आणि भावुक स्टेटसचा पूर आलाय. पण हे स्टेटस पाहताना मनात एक वेगळीच हुरहूर आणि काही अंशी खंत निर्माण होते. आज समाजातील एक वास्तव प्रकर्षाने समोर येतं—काही लोक म्हातारपणी, आजारपणात आपल्या आई-वडिलांकडे साधे ढुंकूनही पाहत नाहीत, पण आजच्या दिवशी मात्र फेसबुक, व्हॉट्सॲपवर ‘माझा बाप, माझा कणा’ म्हणत स्टेटस ठेवण्यात आघाडीवर असतात.अशा दिखाऊ दुनियेत मला माझ्या वडिलांची आणि आम्ही त्यांच्यासाठी घेतलेल्या अहो रात्र 24 तासांच्या अखंड पहाऱ्याची प्रकर्षाने आठवण येते.माझ्या वडिलांना जेव्हा ब्रेन स्ट्रोक चा (अटॅक) आला, तेव्हा आमचं जगच बदलून गेलं. जसे की या काही वेदनादायी आठवणींमध्ये कैद आहे, एकाएकी नियतीने आमची कुटुंबाची मोठी परीक्षा घेतली.ते सलग एक महिना कोमात होते.मृत्यूशी झुंज देत ते पाच ते सहा महिने अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलच्या खाटेवर पडून होते.त्या सहा महिन्यांच्या असह्य संघर्षानंतर जेव्हा आम्ही त्यांना घरी आणलं,तेव्हा त्यांचं शरीर थकलेलं होतं, त्यांना स्वतःला काहीच करता येत नव्हतं.तिथून पुढे सुरू झाला आमच्या भक्तीचा आणि सेवेचा खरा प्रवास. तब्बल दोन वर्ष आम्ही भावंड आई पत्नी भाचा अहोरात्र, क्षण न् क्षण त्यांची सेवा केली.ज्या बापाने बोट धरून जगायचं शिकवलं, त्याच बापाची नवजात बालकासारखी काळजी घेण्याची वेळ आमच्यावर आली होती.सकाळी उठून त्यांचे दात घासण्यापासून, त्यांना आंघोळ घालण्यापर्यंत, त्यांची स्वच्छता राखण्यापासून ते खाऊ घालन वेळच्या वेळी औषधोपचार करण्यापर्यंत सर्वकाही आम्ही स्वतः करत होतो.यात कसलाही कंटाळा नव्हता, की कसलीही सक्ती नव्हती; होतं ते फक्त आणि फक्त आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम कर्तव्य आणि कृतज्ञता.आज जेव्हा लोक पालकांच्या जिवंतपणी त्यांच्या सुखाची, त्यांच्या आरोग्याची साधी चौकशीही करत नाहीत आणि वर्षातून एकदा स्टेटस ठेवून मोकळे होतात, तेव्हा मला माझ्या त्या दोन वर्षांच्या सेवेचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही कधी सोशल मीडियावर वडिलांचे कौतुक करणारे मोठे मोकळे संदेश नाही ठेवले, पण त्यांच्या पडत्या काळात सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो.बापाची खरी सेवा ही २४ तासांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये नसते, तर त्यांच्या म्हातारपणात,आजारपणात आणि असहाय्यतेत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यात असते. ज्या हातांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या हातांना कधीही थरथरू न देणं, हाच खरा ‘फादर्स डे’ आहे.आज वडिलांची आठवण येताना डोळे नक्कीच पाणावले आहेत, पण मनात एकच समाधान आहे. की “दादा, जोपर्यंत तुम्ही होतात, तोपर्यंत तुमच्या सेवेत आम्ही कोणतीही कसर सोडली नाही.तुम्ही आमच्या मनात कालही होतात, आजही आहात आणि चिरंतर राहाल!”वडील जिवंत होते तेव्हाच ते आम्ही सामाजिक काम केलं आणि त्याची बातमी किंवा प्रसिद्धी झाली तर त्याचे कात्रण घेऊन जपून ठेवत असत कधी समोर नाही परंतु पाठीमागे माझ्याकडे भेटायला आल्यानंतर वाटत माझा एखादा मित्र भेटला तर सांगायचे साहेबाला भेटायला आलो होतो आमचं यश पाहून बापाची छाती गर्वाने फुगायची. सेवार्थ करायचा असेल तर जिवंतपणीच करावा. गेल्यावर मासिक जेवण घालून व श्रद्धाचे मोठे जेवण घालून काही उपयोग नाही.सर्व खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा करणाऱ्या लेकरांना आणि पितृत्वाला मानाचा मुजरा!