मनोरंजनातून महिला सक्षमीकरण – शिवप्रसाद उद्योग समूहाचा अभिनव उपक्रम!
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना मनोरंजनासोबत आर्थिक सक्षमीकरणाची जोड देणारा अनोखा उपक्रम शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ’ या लोकप्रिय संकल्पनेतून महिलांना दुग्ध व्यवसायात प्रगतीची दिशा दाखवण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात येत आहे.
तालुक्यातील मांडवे येथे आयोजित करण्यात आलेल्या या रंगतदार कार्यक्रमात गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनाच्या वातावरणात महिलांना व्यवसायिक मार्गदर्शन देण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन सौ. ऋतुजाताई शरद मोरे, शिवप्रसाद मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ. अश्विनीताई रमेश मोरे तसेच एस पी जी इन्शुरन्स अँड ब्रोकिंग प्रा. लि.च्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. प्रियंका ताई वैभव मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. शिवप्रसाद उद्योग समूहाच्या सहकार्याने दूध संकलन, गुणवत्ता तपासणी, बाजारपेठ उपलब्धता आणि योग्य दर याबाबत महिलांना सक्षम बनवले जात आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून दिलेले हे मार्गदर्शन महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.


