नातेपुते पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा पडतो ताण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- नातेपुते ता.माळशिरस  पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे दिसून येत आहे.नातेपुते पोलीस स्टेशन हे तीन जिल्ह्याच्या सीमेलगत असून येथील बाजारपेठे ही मोठी आहे.मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक घडामोडी होत असते. बुधवारी पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडी बाजार व जनावरांचा बाजार या ठिकाणीच भरतो. जवळच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिखर शिंगणापूर मंदिर असून महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे पंढरपूर,पुणे सांगली, सातारा,इंदापूर,अहमदनगर या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे गुन्हेगारांचा वावर ही छुप्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो. पुणे पंढरपूर हा प्रमुख पालखी महामार्ग असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुद्धा आहे.पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 35 खेडी आहेत. तसेच शिवपुरी दूर परिक्षेत्र,फोंडशिरस बीट,धर्मापुरी बीट अशा प्रकारचा भाग असून, डोंगराळ व दुर्गम भाग सुद्धा नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात मोडत आहे. परिसरातील भाग मोठा असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे असून ते सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्युटी करून त्यांच्यावर ताण येत असून त्या कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.काही कर्मचाऱ्यांना प्रसंगी डे-नाईट ड्युटी करावी लागते. त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.नातेपुते पोलीस स्टेशन साठी  १०५ कर्मचाऱ्यांची मंजुरी असून तीन अधिकारी आहेत एक एपीआय व दोन पीएसआय व सध्या 38 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामध्य ६ कर्मचारी साप्ताहिक सुट्टी वर तर २ रजेवर असतात. 30 कर्मचाऱ्यावर व अधिकारी यांच्यावर कामाचा लोड येत आहे. त्यामध्ये डेली वायरलेस साठी दोन, कर्मचारी सीसीटीएनएस साठी दोन कर्मचारी,ठाणे अंमलदार 2 ,दवाखाना एन्ट्री एक ,लॉकअप पोलीस स्टेशन गार्ड चार ,अंगरक्षक एक ,कोर्ट ड्युटी एक, गोपनीय एक,क्राईम एक, बारनिशी एक ,कारकून एक, सिओ दप्तरी प्रत्येकी एक, त्याचप्रमाणे ट्राफिक, ऑफिस,बंदोबस्त, पेट्रोलिंग, अशाप्रकारे कर्मचारी लागतात.परंतु कर्मचारी संख्या कमी असल्याने बाकी कर्मचाऱ्यावर ताण पडत असून याचा परिणाम कामावर होत आहे.सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलीस कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी जनसामान्यातून होताना दिसून येत आहे.

You may have missed