संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिनाची अंमलबजावणी न करणारा देशद्रोहीच…..पंचशीला कुंभारकर

             
                                      नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची  भेट घेऊन निवेदन दिले आहे.निवेदनात 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिवस  म्हणून साजरा करावा आणि जो अधिकारी कर्मचारी प्राचार्य,मुख्याध्यापक टाळाटाळ करील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासननिर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी.याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद पंचायत समित्या,नगरपालिका,महानगर पालिका,ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस पुढीलप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व शासकीय निमशासकीय विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे.
संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी.व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मूलभूत हक्क,कर्तव्य,व जबाबदाऱ्या, इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रित्या दिसतील असे बॅनर, पोस्टर वापरावेत.
याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध/भित्तीपत्रके/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने,कार्यक्रम आयोजित करावेत.संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग,फोटो,5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठवावा.
ज्याप्रमाणे केंद्रसरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबविण्यात यावे.अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख,महाविद्यालयांचे प्राचार्य,शाळांचे मुख्याध्यापक,26 नोव्हेंबर दिनी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून संविधान दिन साजरा करीत नाहीत.शासनाच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करीत नाहीत अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी.सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडीओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत.ज्या शाळा संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करावी.शासकीय अधिकाऱ्यांनी कसुरी केल्यास देशद्रोही समजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे.यामध्ये कसुरी केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल तसेच आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी.असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य सचिव मा.वैभव गिते यांनी दिला आहे.हे निवेदन सामान्य प्रशासनाच्या प्रधान सचिवांना,शासनाच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहे.निवेदनावर राज्य संघटक पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कांबळे,राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांच्या सह्या आहेत.

You may have missed