वसई -विरार शहरात अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री; २५ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
भाजपचे अशोक शेळके यांच्या मागणीला यश
(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )वसई विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक असे अशुद्ध पिण्याचे पाणी विक्री केले जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील २५ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान अशा प्रकारे दूषित पाणी विक्री करणाऱ्या संबंधितांवर फॊजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी केली होती. त्यावरून मागील महिन्यात पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या ५१ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता २६ व्यावसायिकांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साथीच्या विविध आजारापासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्के हुन अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी खरेदी करतात. मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत.विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलाई लाटत आहेत. भाजपच्या अशोक शेळके यांनी या गंभीर प्रकरणी सातत्याने पत्रव्यवहार -पाठपुरावा करून राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अशोक शेळके यांच्या मागणीनंतर वसई – विरार शहरातील पाणी विक्रेत्यांकडे पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात होता. हे नमुने तपासल्यानंतर पाणी अपायकारक असल्याचे समजताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीतर्फे ५१ पाणी विक्रेत्या व्यावसायिकांवर सर्वप्रथम तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते . मात्र हे कारवाईचे सत्र असेच सुरु असून आता प्रभाग समिती एफ तर्फे २५ पाणी व्यावसायिकांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजिवी शास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्या मार्फत तपासले गेले असता, सदरचे पाणी हे पिण्यास अपायकारक असल्याचे अभिप्राय देण्यात आला आहे. एफ प्रभाग समितीमध्ये पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे या तपासणीमद्धे निष्पन्न झाले. महानगरपालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसदेखील बजावण्यात आल्या होत्या. तरी या बोगस कंपन्यांनी महानगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्री करण्याचा व्यवसाय चालूच ठेवला होता. शेवटी २५ पाणी व्यावसायिकांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे दाखल झालेले पाणी विक्री व्यवसायिक :
सुनील ब्राम्हणे, कुमार वझे, अलीम खान, अनवर हुसेन, वामन सुरासे, अब्दुल खान, अबूसामा खान, बसंतलाल यादव, मनोज सिंग, समिम शेख, संजय प्रजापती, लालधारी यादव, अली खान, बबलू भाई, बबु सिंग, रमाशंकर पांडे, नईम शेख, उग्रसेन पाठक, ऐहसान शेख, राजेंद्र कुमार, संजय गुप्ता, शेहनाज शेख, अख्तर शेख, गुड्डू सिंग, राकेश सिंग, सुभाष सिंग