मुद्रा कर्जमर्यादा दुप्पट; २० लाख रुपये मिळणार !
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
: केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत (पीएमएमवाय) मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्याचा निर्णय शुक्रवारी केंद्र सरकारने घेतला. सध्याची कर्जमर्यादा १० लाख रुपये होती. ती २० लाख रुपये करण्यात आली. सरकारने तशी अधिसूचनाही जारी केली आहे.नवउद्योग उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मुद्रा कर्जासाठी तरुण प्लसची नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्याश्रेणीअंतर्गत १० लाखांपेक्षा जास्त आणि २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता दिले जाणार आहे. ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणीअंतर्गत पूर्वीची कर्जे घेतली. जे मुद्रा कर्जदारआहेत आणि यशस्वीपणे परतफेड केली आहे, त्यांच्यासाठीही हे कर्ज उपलब्ध असेल. २० लाखांपर्यंतच्या मुद्रा कर्जाची हमी क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिटस्अंतर्गत प्रदान केले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजना ही नॉन-कॉर्पोरेट, बिगर शेती लघू/सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्यासाठी पंतप्रधानांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केलेली योजना आहे. याअंतर्गत दिले जाणारे कर्ज मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहे. या योजनेअंतर्गत बँका, नॉनबँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म-वित्त संस्था आणि इतर आर्थिक मध्यस्थांद्वारे कर्ज प्रदान केले जाते.