ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस निरीक्षक गट अ व ब दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रधान करण्याचा गृह विभागाचा प्रस्ताव असंविधानिक- ॲड.डॉ.केवल उके

असंविधानिक चुकीचा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार-वैभव तानाजी गीते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृह विभागाचा प्रस्तावित असंविधानिक प्रस्ताव असून तो प्रस्ताव ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी एन डी एम जे चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके व राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे .
, दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याबाबत विधी व न्याय विभागाच्या सहमतीने निर्गमित करावयाच्या अधिसूचनेचे प्रारूप शासनास तात्काळ सादर करण्या बाबतच्या सूचना राज्य पोलीस महासंचालक यांना केल्या आहेत. परंतु सदर निर्णय हा चुकीचा असून तसे झाल्यास अॅट्रॉसिटीच्या खटल्यात येणाऱ्या काळात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊन खटले निर्दोष सुटतील यात मुळीच शंका नाही आणि याचा परिणाम म्हणून राज्यातील अनुसूचित जाती-जमातींवर अन्याय करणारे सरकार म्हणून आघाडी सरकारची प्रतिमा निर्माण होईल याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ व सुधारती अधिनियम २०१५ हा कायदा केंद्रीय कायदा असून महाराष्ट्र शासनासह देशातील सर्वच राज्यांनी आहे तसाच स्वीकृत केला आहे. या मध्ये संपूर्ण देशात केवळ बिहार राज्याच्या मा. राबडीदेवी सरकारने यात काही बदल करण्याचा प्रयत्न वर्ष २००२ मध्ये पोलिस उपधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे तपासात विलंब होत असल्याच्या कारणास्तव केला होता जो अनेक तांत्रिक अडचणीत अद्याप फसला आहे. बिहार सरकारने अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ च्या कलम ९ चा वापर करून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला केसेस मध्ये तपास करण्याचा अधिकार दिल होता परंतु सदर निर्णयाच्या संवैधानीकतेवर अनेक याचिका मा.पटणा उच्च नायलयात दाखल झाल्या होत्या. दिनांक १८ जानेवारी २०११ रोजी मा. पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या.श्रीमती रेखा दोषीत व न्या.श्री ज्योती सरण यांच्या खंडपीठाने “अनिल कुमार वि. बिहार राज्य व इतर” या खटल्यात दिलेल्या निर्णयानुसार ३१ मार्च १९९५ पासून तर ९ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या हजारो ॲट्रॉसिटीच्या केसेस रद्दबाद करण्याचा आदेश बिहार सरकारला दिला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे ३ जुन २००२ रोजी बिहार सरकारने निर्देशित केलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ॲट्रॉसिटी केसेस मध्ये चौकशी करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता व सदर आदेशाला पूर्वलक्षित वर्ष १९९५ पासून लागू करण्यात आले होते. मात्र सदर आदेश राज्याच्या राजपत्रात दिनांक ९ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ॲट्रॉसिटी नियमावलीच्या नियम ७ नुसार तसे तपासाचे अधिकार फक्त पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच आहेत. म्हणून चौकशी योग्य अधिकाऱ्याने न केल्याच्या तांत्रिक कारणामुळे दिनांक ३१ मार्च १९९५ पासून तर ९ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या हजारो हजारो अट्रोसिटीच्या केसेस रद्द करून तेथील हजारो अनुसूचित जाती-जमातींच्या पिडीतांना न्याय नाकारला होता ज्याचा राजकीय परिणाम अद्याप बिहार राज्यात अनुभवण्यात येतो. सदर खटल्यात मा. पटना उच्च न्यायालयाने मा.सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास भारतीय संविधानाच्या कलम १३४-अ नुसार आवश्यक असलेली परवानगी नाकारल्यामुळे मुद्दा तिथेच थांबला असला तरीही सदर अन्याय भारतीय अद्याप विसरले नाहीत.

अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९९५ व सुधारित नियम २०१६ च्या नियम ७ नुसार तपासाचे अधिकार उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आहेत. पोलिस निरीक्षक आणि तत्सम अधिकारी हे स्थानिक दबावात असण्याच्या शंके मुळे तपास निपक्षपाती व गुणवत्तेच्या आधारावर होऊन शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकरिता ॲट्रॉसिटीच्या केसेसचा तपास उच्चपदस्थ पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच व्हावा असे कायद्याच्या उद्देशीकेतच नमूद आहे. महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ व सुधारती अधिनियम २०१५ च्या कलम ९ नुसार तपासाचे अधिकार बहाल करण्याचे मर्यादित अधिकार आहेत परंतु त्यांची व्याप्ती केवळ एखाद्या जिल्हयापूरती व काही केसेस करिता आणि पोलिस अधिकारी व्यतिरिक्त विशेष अधिकारी किंवा पोलिस विभागाव्यतिरिक्त त्यांच्या पेक्षा वरिष्ठ दर्जाच्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला किंवा विशेष तपास यंत्रणेच्या अधिकारी वर्गास बहाल करावे असे अपेक्षित आहे. परंतु स्वतःच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन वेगळे नियम बनविण्याचा व नियम ७ मध्ये असा खोडसाळपणा करून बदल करण्याचा अधिकार नसून हे असंविधानिक आहे. यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल वाढणार असून अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींच्या नागरिकांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढणार आहे. तसेच शिक्षेचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षाही कमी होणार व तपासात राजकीय हस्तक्षेप सुद्धा वाढणार आहे.

महाराष्ट्र राज्याची प्रतिमा ही पुरोगामी असून महाराष्ट्र आणि बिहार मध्ये फरक आहे. बिहार राज्यात ३८ जिल्हे असून वर्षाला जवळपास ६००० ते ७००० गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रात वर्षाला जवळपास २५०० ते ३००० गुन्हे दाखल होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो च्या क्राइम इन इंडिया रिपोर्ट २०२० नुसार बिहार राज्यात वर्ष २०२० मध्ये एकूण अनुसूचित जातीवरील अत्याचारचे दाखल गुन्हे ७३६८ इतके तर महाराष्ट्रात २५६९ एवढे आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात एकूण १ लाख ८० हजार एवढी पुरेशी पोलिस यंत्रना असून पोलिस उपाधिक्षक दर्जाचे अधिकारी सुद्धा मुबलक आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृह विभागाचा प्रस्तावित असंविधानिक व अन्यायकारक प्रस्ताव नाकारण्यात यावा ही विनंती. अशाप्रकारे एन डी एम जे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आल्या असून हे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना सुद्धा देण्यात आले आहे या निवेदनावरतीॲड.डॉ.केवल उके(राज्य महासचिव),वैभव तानाजी गिते(राज्य सचिव),मा.पी.एस.खंडारे(राज्य सहसचिव), पंचशीला कुंभारकर (राज्य महिला संघटक), प्रमोद शिंदे (राज्य प्रसिद्धीप्रमुख), यांच्या सह्या आहेत

You may have missed