न्यायसहायक जागृती कार्यक्रम- २०२० ला उत्स्फुर्त प्रतिसाद

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई): न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र शासनचे प्रभारी संचालक आणि शासकीय रासायनिक विश्लेषक डॉ. कृ. वि. कुलकर्णी यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या न्यायसहायक जागृती कार्यक्रम-२०२० या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी केलेल्या आवाहनास मान्यवर अधिकाऱ्यांसह जनतेचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.
राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई येथे मुख्यालय असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तसेच चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथे लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील प्रयोगशाळांमध्ये समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पध्दतीने विश्लेषणाचे कार्य केले जाते. अलीकडच्या काळात गुन्हेगारांमध्ये गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्रीचा वापर होत असून त्या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालांवर रासायनिक विश्लेषण करून सामाजिक हिताच्या दृष्टीकोनांतून तपासी यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करून देणेकामी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची महत्वाची भूमिका आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील विश्लेषणात्मक कार्याची माहिती प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे दि. २१/०१/२०२० व दि. २२/०१/२०२० या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेदरम्यान न्यायसहायक जागृती कार्यक्रम-२०२० चे आयोजन करण्यात आले होते. तर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर आणि लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथे दि. २०/०१/२०२० ते दि. २४/०१/२०२० या कालावधीत आयोजन केले आहे. सदरच्या न्यायसहायक जागृती कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, पोलिस तपासी अधिकारी व अभियोग न्यायालयासंबंधी असलेल्या अभियोक्ता यांनी त्यांच्या प्रमुखांच्या पूर्वसंमतीने तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या शिक्षणार्थींना त्यांच्या महाविद्यालयामार्फत/विद्यापीठामार्फत पूर्वसंमतीने त्या त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात आले होते. या जागृती प्रदर्शनाकरिता अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, पत्रकार, पोलिस, वकील, अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांनी हजेरी लावली अशी माहिती शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेचे विधी विभाग प्रमुख डॉ.केवल उके यांनी दिली.

You may have missed