केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आज गुरुवार दि. 12 मार्च रोजी राजसभा निवडणुकीचा अर्ज भरणार




पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )मुंबई दि. 11 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आज गुरुवार दि.12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राज्यात भाजपशी युती असल्याने रिपाइं एन डी ए चा घटक पक्ष आहे. भाजप रिपाइं युती चे उमेदवार म्हणून ना रामदास आठवले उद्या राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असून या वेळी त्यांच्या समवेत भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भाजप प्रदेश अध्यक्ष चांद्रकांतदादा पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील.

येत्या दि. 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 7 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 मार्च पर्यंत आहे. ना रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल रोजी संपत आहे.ते यापूर्वी 2014 च्या राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून ना.रामदास आठवले यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
राज्यसभेसाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणुन रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. उद्या गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ना रामदास आठवले राज्यसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज विधानभवन येथे भरणार आहेत. भाजप ने मित्रपक्ष म्हणून राज्यसभेची महाराष्ट्रातील एक जागा रिपाइं( आठवले) या पक्षाला सोडली असल्याने ना रामदास आठवले आपल्या रिपाइं च्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.