मोखाड्यातील आदिवासी मजूर वेठबिगारी प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे कलमवाढ करण्याची एन.डी.एम.जे.संघटनेची मागणी

मोखाड्यातील आदिवासी मजूर वेठबिगारी प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे कलमवाढ करण्याची एन.डी.एम.जे.संघटनेची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पालघर संदेश भालेराव
पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्र.६१/२०२१, भांदवी कलम ३७४ आणि वेठबिगारी प्रतिबंध कायदा कलम १७ व १८ नुसार दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी आरोपी रामदास कोरडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची हकीकत अशी आहे की, मोखाड्याच्या आसे गावातील आदिवासी मजूर काळू पवार याने नोव्हेंबर २०२० मध्ये मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आरोपी रामदास कोरडे याच्या कडून ५०० रुपये उसने घेतले होते. त्याच्या परतफेडीचा करिता आरोपी रामदास कोरडे काळू पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाला वर्षभर वेठबिगारासारखे वागवून छळ करत होता.
दिनांक १३ जुलै २०२१ रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आरोपी रामदास कोरडे याने आदिवाशी मजूर काळू पवार हा कामावर का आला नाही असे म्हणून त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. सदर अपमान व छळाला कंटाळून काळू पवार याने तेव्हाच गळफास घेवून आत्महत्या केली.
दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी सदर बातमी कळताच नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे मुंबई-ठाणे प्रदेशचे अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, नितेश गायकवाड पिडित कुटुंबाची भेट घेवून घटनेची फॅक्ट फाइंडिंग केली.
सदर घटनेला न्याय देण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी पिडीतांना भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मोखाडा पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे कलमवाढ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. सदर प्रकरणात पिडित कुटुंबाला योग्य न्याय मिळावा या करिता साक्षीदारांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार न्यायदंडाधिकारी मार्फत नोंदविन्याची सुद्धा यावेळी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव डाॅ.केवलजी उके, मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावने, प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे, कल्याणअध्यक्ष नितेश गायकवाड, पालघर अध्यक्ष चेतन शेवाळे, उपाध्यक्ष हेमंत शिंगडे, सचिव सुरेश वळवी, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष पांडुरंग पालवे, सचिव प्रकाश गोडे व मोखाडा तालुका सचिव मयूर पागी इत्यादी उपस्थित होते.

You may have missed