पत्रकारीता क्षेत्रातीलच काही बांधवांच्या अहंकारी वृत्तीमुळे “पत्रकार एकता” धोक्यात- गणेश जाधव जालना
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पत्रकारीता क्षेत्रातीलच काही बांधवांच्या अहंकारी वृत्तीमुळे “पत्रकार एकता” धोक्यात… गणेश जाधव जालना यांचं वास्तव वादी सोशल मीडियावर खंत
– दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे की, पत्रकारीता क्षेत्रात अहंकाराने आपली व्याप्ती वाढवल्याचे जाणवत आहे. “मी एकटाच पत्रकार भारी” किंवा “आम्ही चार चौघेच भारी बाकी चिल्लर” किंवा “आपण सोडून इतर पत्रकारांची लायकी नाही” ही भावना दुर्दैवाने वाढत चालली आहे. मी पणा अथवा अहंकाराने एवढे ग्रासले आहे की स्वतःला सर्वात श्रेष्ठ /भारी (?) दाखवण्याच्या नादात काही पत्रकार इतर चांगल्या पत्रकारांचेही खच्चीकरण करण्यास डावपेच आखू लागले आहेत. दुसरे पत्रकार कितीही चांगले असले, कितीही इमानदार असले आणि कितीही कर्तृत्ववान असले तरी आपल्या कानाखालचे नाही किंवा आपली हुजरेगिरी करणारे नसतील तर त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आपल्याच काही बांधवांकडून होताना दिसत आहे. मान्यवरांच्या नजरेतही स्वतःला सर्वश्रेष्ठ दाखवून बाकीच्या पत्रकारांना चिल्लर दाखवण्याची मानसिकताही वाढू लागली आहे. एवढेच नव्हे तर जो आपल्या कानाखालचा नाही किंवा आपली हुजरेगिरी करणारा नाही तो जर स्वकर्तृत्वावर पुढे जात असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यास ब्रेक किंवा अडथळा कसा निर्माण करता येईल याचेही प्रयत्न केले जात आहेत.
पत्रकारीता क्षेत्रात काही पत्रकारांच्या डोक्यात घुसलेल्या या अहंकारामुळे सर्वसामान्य पत्रकारांसाठी पोषक वातावरण तयार होण्यास अडचणीचे तर ठरत आहेच, शिवाय परस्पर संवादावरही याचा गंभीर परिणाम होत आहे. इतर सर्व पत्रकारांना पाण्यात पाहण्याची अथवा तुच्छ समजण्याची ही संकुचित मानसिकता पत्रकार एकतेसाठी धोक्याची घंटा आहे यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे खरंच मनातून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत व्हावा असं वाटत असेल, खरंच पत्रकारांना पोषक वातावरण तयार व्हावं असं वाटत असेल आणि पत्रकार एकता मजबूत व्हावी असं वाटत असेल तर अंतर्मनातील मी पणा अथवा अहंकाराच्या मानसिकतेला सोडल्याशिवाय गत्यंतर नाही….
अपेक्षा एवढीच की, आपल्या पत्रकार बांधवांना सहकार्य करणे शक्य नसेल तर हरकत नाही परंतु त्यांचे खच्चीकरण अथवा अडथळा आणण्याची मानसिकता तरी ठेवू नये. आधीच इमाने इतबारे काम करणारे असंख्य पत्रकार बांधव अनेक संकटांचा सामना करत समाजहितासाठी लढा देत आहेत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतानाही तारेवरची कसरत करत कुटुंबाच्या जबाबदारीसह आपले कर्तव्य पार पाडत आहेत. समाजहितासाठी वर्षानुवर्षे घर जाळून कोळशे करणाऱ्या पत्रकार बांधवांना खंबीरपणे साथ देऊन पत्रकार एकता बळकट करणे आवश्यक असताना, आपल्याच क्षेत्रातील काही बांधव स्वतःच्या अहंकारापोटी इतर सर्वसामान्य पत्रकारांचे खच्चीकरण करण्याची मानसिकता ठेवत असतील तर ही खुप मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
धन्यवाद…
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए
– गणेश जाधव (पत्रकार, जालना)
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳