नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा. भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.
नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा.
भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.
नालासोपारा, गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी,, २०२० :- वसई तालुक्यातील नायगाव पूर्व टीवरी येथे ग्लोबल अरेना नामक लेआऊटमधील सॅन्टेक वेस्टवल्ड हा एकूण १५० एकर जागेवर २२ माजली ७ टोलेजंग इमारती असलेला बांधकाम प्रकल्प धोकादायक असून या बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
सदर बांधकाम प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून या २२ माजली टोलेजंग इमारतीच्या पायाखालील जमीन खचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इमारतीशेजारील मुख्य रास्ता आणि आसपासची जमीन खचल्यामुळे या बांधकाम प्रकल्पाची पायाभरणी करताना काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी राहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा बांधकाम प्रकल्प धोकादायक असून यामध्ये घर खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या कामात झालेला हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा याबद्दल संबंधित विकासक, आर्किटेक्ट, कंट्राक्टर आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून सदरचा धोकादायक बांधकाम प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.