जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया

जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया नातेपुते : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातला बदल इतिहासात प्रथमच आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या पंढरीच्या पायी वारीला करावा लागला कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक वारकरी समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे. ह भ प मनोहर महाराज भगत जेष्ठ किर्तनकार नातेपुते असे मत पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना मांडले जन्माचा वारकरी येतो तुझ्या दारी पांडुरंगा घालाव ही कोरोना महामारी ज्याने थांबवली तुझी पंढरीची पायी वारी महाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. एक आहे शयनी एकादशी तर दुसरी आहे प्रबोधिनी एकादशी होय. नववधूला ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरचा ओढा असतो त्याप्रमाणे वारकरी भाविकांना पंढरीची ओढ असते भेटी लागी जीवा लागलीसे आस पंढरीये माझे माहेर साजणी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी तसेच आपुल्या माहेरा जाईन मी आता नववधूला ज्याप्रमाणे सासरी आपले माहेरच्या आई-वडील भाऊ, बहिणीची आठवण होते त्याचप्रमाणे वारकरी भाविकांना आपल्या पांडुरंगाची आठवण होते. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंग मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधीले व मी केव्हा पंढरीला जाईल, अशी तळमळ वाटते.पंढरीच्या वाटे वारकरी हुरूहुरू पाहे त्यांचे माहेर,पांडुरंग त्यांचा पिता, चंद्रभागा त्यांची बहीण, पुंडलिक त्यांचा भाऊ यांना कधी भेटेन, उंदड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे अशी मनात प्रेमाची सदिच्छा असते. सासरी बंधने माहेरी मुक्तता. सासरी दु:ख तर माहेरी सुख असते. सासरी काम असते तर माहेरी आराम असतो. कन्या सासुऱ्याशी जाये। मागे परतोनि पाहे
तैसे जाले माझ्या जीवा। केव्हा भेटसी केशवा वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे, तेच ते विचार, आचार, व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठीच चालायचे, इतरांचे विचार व अनुभव समजून घेणे, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी. प्रेमाची मात, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दावा, बुद्धीसाठी दुवा हीच पंढरीच्या वारीची हवा या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा, पदप्रतिष्ठा विसरणे म्हणजे पंढरीची वारी होय. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हे लोकमान्य होतात, देवमान्य होतात व आपलं मोठेपण विसरून गळ्यात टाळ घेऊन विठू माऊलीच्या हरिनामात दंग होतात, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल मुकी उच्चारा हे वारीचं वैभव व मोठेपण आहे. सामाजिक सहजीवनाची हाक निर्माण होणं वारी आहे. कपाळी गंध, मनाला नामाचा छंद, हृदयामध्ये गोविंद ही वारीची अंतरंग साधना आहे व गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ एकादशीला करतो फराळ, जो प्रपंच विसरतो, तो खरा वारकरी होय. सुखरुप ऐसे कोण दुजें सांगा माझ्या पांडुरंगा सारिखेंते एकनिष्ठ असणे हेच त्यांचे ज्ञान सुख आहे. शब्दांच्या रूपानं हे संतच पिढ्या-पिढ्यांचे सांगाती झाले आहेत. अटळ कृतज्ञता व चराचरांतील श्‍वास, निःश्‍वासाचं कारण केवळ विठू माउली आहे, ही अढळश्रद्धा. या श्रद्धेतच युगायुगांना ओलांडून पाझरणाऱ्या अमृतानुभवाचं रहस्य दडलं आहे. असे लक्षावधी श्रद्धामेघ टाळ-मृदंगांच्या गजरात नाचत-गात पंढरीकडे निघण्याचा हा भक्तिऋतू. चंद्रभागा होऊन, वाळवंटाचीही मखमली हिरवळ करून झपूर्झा जगण्याचा हा दिंडीक्षण. आषाढी सोहळ्याला आपल्या नादमयी व चित्रमयी दृष्टीनं संतमहात्मे शब्दबद्ध करतात, तेव्हा अवघे पंढरपूर समोर उभं ठाकते. आषाढीचा हा भक्तीचा महोत्सव हाच एक आपल्या जीवनातील अज-अमर महामहोत्सव आहे आषाढी सोहळ्यासाठी दाटून आलेली वैष्णवांची मांदियाळी तर आहेच
खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।