आदिवासींना लाखो रुपयाने गंडवणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीवर फसवणुकीेसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल.

आदिवासींना लाखो रुपयाने गंडवणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीवर फसवणुकीेसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल..

बंटी फरार तर बबली गजाआड..

संदेश भालेराव ठाणे वार्ताहर

: दिनांक ४ जून रोजी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये बोहनोली गावातील १२ आदिवासी कुटुंबांना सिएट कंपनीकडून मोफत पुनर्वसन करण्याचे खोटे आमिष देवून कंपनीने पिडीतांना दिलेल्या आर्थिक मदतीमधून ७२ लाख ५० हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वर्ग करून आदिवासींची फसवणूक केल्याचा गुन्हा येथील स्थानिक कथित समाजसेवीका आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर, ॲड. तृषांत आरडे आणि अशोक भोईर यांच्यावर झाला आहे. गुन्हा क्रमांक १८०/२०२२ नुसार भांदवी कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, १२०-ब, ३४ आणि ॲट्रोसिटी कायदा कलम ३(१)(जी), ३(२)(पाच) आणि ३(२)(पाच-अ) नुसार गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर हिला दिनांक १० जून २०२२ रोजी अटक करून कल्याण येथील न्यायालयात ११ जून रोजी हजर केले असता न्यायालयाने तिला ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. इतर दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सविस्तर घटना अशी की, मौजे बोहनोली गांव, अंबरनाथ येथील कणकवाडी या ठिकाणी गावठान जमिनीवरील ९७ गुंठे जागेवर काही आदिवासी कुटुंबे अनेक पिढ्यांपासून वर्षानुवर्षे राहत होते. वर्ष २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने बोहनोली गावाच्या गावठानच्या बाजूच्या काही जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास संस्थेला (एम.आय.डी.सी.) दिल्या परंतु त्यामध्ये बोहनोली कणकवाडी (चिंचेवाडी) येथील गावठान जागेवरील ९७ गुंठे जागेचा समावेश न्हवता आणि आज सुद्धा सदर जमिनीच्या ७/१२ वर महाराष्ट्र औद्योगिक विकास संस्थेचा (एम.आय.डी.सी.) शिक्का आढळून येत नाही.

परंतु मागील काही वर्षापासून सिएट कंपनीने सदर गावठान जमीन बेकादेशीररित्या लुबाडून, झोपड्या जाळून, रस्ते उध्वस्त करून व बेकायदेशीररीत्या कंपाउंड उभारून आदिवासींचे राहते घर व गांव सोडण्यास भाग पाडले. तेथे अनधिकृत बांधकाम करून आदिवासी कुटुंबाची इतरत्र जमीन देवून त्यावर घर, रस्ता, वीज व सिएट कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी देवून आर्थिक पुनर्वसन करण्याचे खोटे आश्वासन देवून फसवणूक केली. याकरिता मध्यस्थी करण्या करीता येथील स्थानिक आगरी समाजाच्या आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर या समोर आल्या आणि वकील ॲड.तृषांत आरडे हे गोरगरिबांना मोफत मदत करीत असल्याचे सांगून त्यांची सिएट कंपनीमध्ये बाजू मांडली.

आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर व वकील तृषांत आरडे यांच्या मध्यस्थिने माहे मे २०२१ मध्ये, कंपनीचे अधिकारी अमित तांबे आणि अजय देसाई यांच्यावर कल्याण सत्र न्यायालयात सुरू असलेली जुनी ॲट्रोसिटीची केस व सर्व इतर तक्रारी मागे घेण्याच्या अटीवर १३ आदिवासी इसमांना प्रत्येकी ११ लाख रुपये व शिरवली गावात १७ गुंठे जमिनीवर सर्व सोई सुविधेसह घरे बांधून व नोकरी देवून पुनर्वसन करण्याचे ठरले.

माहे मे २०२१ च्या शेवटच्या आठवडयात आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर, वकिल तृशांत आरडे व अशोक भोईर यांनी सदर १३ आदिवासिंना बदलापूर येथे बोलावुन त्यांना सीएट कंपनीमध्ये नोकरी संदर्भात अर्ज करायचे आहे असे खोटे सांगुन त्यांचे ओरिजनल पँन कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड व फोटो लावून कागदावर अंगठे घेतले व त्यांचे दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे शाखा बदलापूर या बँकेत खाते उघडले तसेच स्वतःचे सुद्धा खाते याच बँकेत उघडले.

दिनांक ३० जून २०२१ रोजी सदर मध्यस्थी मार्फत बाँड पेपरवर अशिक्षित आदिवासींचे अंगठे घेवून बेकायदेशीर तडजोड करण्यात आली व पिढीत संतोष वाघे यांनी मा.दिवाणी न्यायालय कल्याण येथे दाखल दावा क्र.२१/२०१८ आणि त्याची पत्नी भुरी संतोष वाघे हिने मा.सत्र न्यायालय कल्याण येथे दाखल ॲट्रोसिटीची केस क्र.१९३/२०१९ मागे घेण्यास भाग पाडले. याच्या मोबदल्यात सीएट कंपनीने भोलानाथ पांडु वाघ, संतोष सोमा वाघे, पिंटया पांडु वाघ, संगीता हिलम, जाईबाई पांडु वाघे, सिता रघुनाथ वाघ, शनिवार शिवा वाघ, बाळाराम शनीवार वाघ, पिंटया व सिता एकनाथ हिलम, अर्जुन नत्थु वाघ, अरूण पांडु वाघ, लक्ष्मी गज्या वाघे, दर्शना व सोमनाथ व दिपक गजानन वाघे या तेरा कुटुंबांना सीएट कंपनी कडून आर्थिक मदत म्हणून आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या अंधेरी शाखेचे प्रत्येकी ११ लाख प्रमाणे एकूण १कोटी ३२ लाख रुपयाचे १३ डी.डी. आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर यांनी घेतले व प्रत्येकाच्या खात्यात जमा देखील केले. परंतु आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर आणि अँड. तृषांत गंगाधर आडे यांच्या माध्यमातून या सर्व आदिवासी कुटुंबाची बैंक पासबूक घेवून त्यांचे आंगठे घेऊन खोटे दस्तावेज तयार करून तसेच दमदाटी करून त्यांच्या खात्यावर आलेली रक्कम परस्पर खात्यावर वळवली. यात आरोपी किशोरी वाडेकर तथा पाटील हिने एकूण रक्कम रुपये ५८लाख ५०हजार स्वतःच्या दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे शाखा बदलापूर या बँकेतील खाते क्र.२४५२७ मध्ये चेकद्वारे ट्रान्स्फर करून घेतली. तसेच आरोपी अँड.तृषांत गंगाधर आरडे याने एकूण रक्कम रुपये रुपये १३ लाख स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन ट्रान्स्फर केले. अश्याप्रकारे या तिकडी गँगने आदिवासी पिडीतांचे एकूण ७२ लाख ५० हजार रुपये चेक व ऑनलाईन पद्धतीने आणि इतर लाखोंची रोख रक्कम सुद्धा पिडीत आदिवासींचे अंगठे घेवून काढून घेतली. हे सर्व करण्याकरिता आरोपी अशोक भोईर यांनी मदत केली. आरोपींनी आदिवासी पिडीतांना केवळ थोडीफार रक्कम देवून त्यांनी वारंवार विचारणा केली असता अनेक उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना पळवून लावले. शेवटी त्यांच्या खात्यात काहीच रक्कम शिल्लक नाही व सर्व पैसे आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर आणि ॲड.तृषांत आरडे यांनी अशोक भोईर यांच्या मदतीने हे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केल्याचे त्यांना बँकेने कळविल्यावर आपली फसवणूक झाल्याचे आदिवासी पिडीतांच्या लक्ष्यात आल्यावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावणे यांना माहिती देण्यात आली. संघटनेचे वरिष्ठ ॲड.केवल उके यांच्या मार्गदर्शनात या सर्व आदिवासी पिडीतांना तत्काळ मदतीचा हात दिला व शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी माहितीची शहनिशा करून दिनांक दिनांक ४ जून २०२२ रोजी गुन्हा क्रमांक १८०/२०२२ नुसार भांदवी कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, १२०-ब, ३४ आणि ॲट्रोसिटी कायदा कलम ३(१)(जी), ३(२)(पाच) आणि ३(२)(पाच-अ) नुसार या तिन्ही भामट्यांवर गुन्हा दाखल केला.

You may have missed