उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत
उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत
नातेपुते (प्रमोद शिंदे): उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी मॉकड्रीलच्या नावाखाली मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे कोरोना संक्रमित रूग्ण आढळल्याचे पत्र काढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याने त्यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एड. सुमित राजू सावंत यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिनांक 06/05/2020 रोजी माळशिरस विभागाच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी क्र.कार्या/अ-2/जबाबी/कावि/556/2020 या पत्रान्वये मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला असून त्यास सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे तेथून 5 किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचा आदेश पारित केला होता. दरम्यान सदरचे व्हायरल झालेले पत्र कार्यालयाच्या लेटरपॅडवर प्रसिध्द झाले असून या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याची धास्ती वाढली होती. मात्र सदरचा प्रकार दुपारनंतर डेमो असल्याचे समजले. परंतु जगभरातील कोरोनाचे वाढते रूग्ण व त्याचे बळी वाढत असताना व सर्वसामान्य माणसांमध्ये कोरोना बद्दल धास्ती असताना अशा प्रकारची अफवा प्रशासनाद्वारेच पसरवून सर्वसामान्य जनमाणसांत भीतीसह असुरक्षिततेची भावना वाढविल्याने लोक भयभीत झाले. वास्तविक पाहता असा आदेश काढून मॉकड्रील घेऊन सामान्य जनतेत भीती व अफवा पसरविण्यास योग्य वातावरण निर्माण करणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. त्याचबरोबर सध्या कोरोना व इतर सारीसारख्या जीवघेण्या महाभयंकर रोगांची साथ सुरू असताना व केंद्रासह महाराष्ट्र शासनाचे कोरोनासह अशा रोगांवर चुकीची कमेंट करणे, अफवा पसरविणे हे गुन्हा आहे व हे करू नये असे सुस्पष्ट सक्तीचे आदेश असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे सदर आदेशांना केराची टोपली दाखवली. त्याचबरोबर संदर्भीय आदेश सोशल मिडीयावर व्हायरल करून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केल्याने एड. सुमित सावंत यांनी या प्रकाराचा, घटनेचा जाहीर निषेध केला. तसेच समाजात चुकीचा संदेश जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एड. सुमित सावंत यांनी केली आहे.

