ऍट्रॉसिटी कायद्यात संदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या महत्वपूर्ण निवाड्यांचे ऍड.केवल उके यांच्याकडून टीकात्मक मूल्यांकन
ऍट्रॉसिटी कायद्यात संदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या महत्वपूर्ण निवाड्यांचे टीकात्मक मूल्यांकन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- अॅड. (डॉ) केवल उके, राज्य महासचिव,एन.डी.एम.जे. महाराष्ट्र“आमचा लढा हा सत्ता किंवा संपत्ती मिळविण्यासाठी नाही, तर न्याय व स्वातंत्र्य प्राप्तीचा आणि मानवी अस्तित्व पुनरस्थापने करिताचा हा संघर्ष आहे….” डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माननिय न्यायमूर्ती ब्रिजगोपाळ लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी, राफेल व्यवहारातील कथित घोटाळा, नोटबंदीचा घोटाळा, पीएम केअर फंडाचा निधी, अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये नाव नोंदवलेल्या अर्णब गोस्वामी यांना जामीन देण्याचं प्रकरण ते अलीकडेच संजीव भट यांना सुनावण्यात आलेली जन्मठेप या सर्व निकालावरून भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची गुणवत्ता किंवा दर्जा यावर प्रश्न चिन्ह उभे होत असतांना ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि स्वतंत्र विधी संशोधक श्रीमती मिताली गुप्ता यांनी यासंदर्भात वर्ष २००९ ते २०१९ या दहा वर्षाच्या निकालांचा अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला आहे. दहा वर्षात सर्वोच्च न्यायालयाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेत काही फरक पडला आहे की नाही? हे निश्चित करण्याच्या द्रुष्टीने हा अभ्यास करण्यात आला. अन्य देशातील निकालपत्रांमध्ये भारतातील विविध न्यायालयांमध्ये देण्यात आलेल्या निकालपत्रांचा संदर्भ कसे घेतले जातात, याचा अभ्यास करण्यात आला. न्यायालयातील हे निकाल धोरणांभोवती फिरणारे असल्याने यासाठी देण्यात आलेले निवाडे आंतरराष्ट्रीय सत्तरावर संदर्भ म्हणून घेतले जातात. कायद्यातील बहुतांश संदर्भ हे राष्ट्रांच्या सीमा पार करणारे असतात. यामुळेच ज्या देशातील न्यायव्यवस्था अधिक निष्पक्ष असते अशा न्यायालयाचे निर्णय संदर्भ म्हणून घेण्याची एक पध्दत आहे. यामुळे एकसारख्या घटनांच्या निकालांची चर्चा सर्वदूर होते. परंतु मागील दहा वर्षात आंतरराष्ट्रीय सत्तरावर भारतीय न्याय व्यवस्थेच्या निकालांची गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह होत असल्याचे नमूद करणायात आले आहे. या अनुषंगाणे अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात न्यायालईन भूमिका आणि महत्वपूर्ण निवाड्यांवर सुद्धा चर्चा करणे महत्वाचे आहे. तत्पूर्वी भारतीय समाज व्यवस्थेची जातीभेद आणि अत्याचार संदर्भातील जे अनेक गैरसमज आहेत यावर सुद्धा थोडक्यात प्रकाश टाकला पाहिजे. अनेकदा असे म्हटले जाते की, अस्पृश्यता हि संकल्पना कालबाह्य झाली आहे, जाती आधारित निर्बंध हे व्यवस्थेचा भाग असल्याचे भासवले जाते. अनेकदा जातीने संबोधणे हा काही गुन्हा नाही किंवा हा व्यवहाराचा भाग आहे असेही म्हटले जाते. उच्च-शिक्षित, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या प्रस्थापीत लोक जातीभेद पाळत नाहीत व अत्याचार करत नाहीत किंवा शिक्षित, प्रस्थापित, धर्मांतरित दलित या सर्वातून मुक्त झालेत असे म्हटले जाते. अनेकदा असा गैरसमज पासरवीला जातो की जातीभेद किंवा अस्पृष्यता इत्यादी गावात-खेड्यात पाळली जाते, शहरात हा प्रकार नाही. अनेकदा दलित-आदिवासी यांच्या चारित्र्यावर संशय केला जातो आणि मग दलितांना गाऱ्हाणे करण्याची सवय झाली आहे, दलित हे गुन्हेगारी प्रवूत्तीचे असतात, ते विश्वासपात्र नाहीत, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो- मुख्यत्वे अर्थ सहाय्य मिळविण्या करीता अशी कारणे देवून अनेकदा नैसर्गिक न्याय हा नाकारला जातो. यामध्ये काही अपवाद वगळता न्यायालईन व प्रशासकीय व्यवस्थेतील न्यायाधीश किंवा अधिकारी सुद्धा मागे नाहीत, त्यांची सुद्धा अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. यामध्ये जातीमुळे अत्त्याचार झाला नाही, भारतीय दंड संहिते नुसार गुन्हा दाखल करणे किंवा शिक्षा देणे पुरेशे आहे, अॅट्रॉसिटी ची काय गरज आहे? तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सरकारी वकील यांच्यावर जातीचा प्रभाव नसतो, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे अत्याचाराचे प्रमाण कमी झाले असे म्हटले जाते. अनेकदा सामाजिक बदला पेक्षा व्यक्तिगत न्यायाला महत्वाचे दिले जाते आणि त्याकरिता दबावतंत्र वापरून केस मिटविल्या जातात, फिर्यादीला फितूर केले जाते व केस खारीज केली जाते, गुन्हा दाखल होण्यास उशीर, तपासातील तृटी किंवा जात आधारित बाबी इत्यादी तांत्रिक कारणांना अतिमहत्व देवून केसाचा निर्दोष निकाल दिल्या जातो. भारतातील अनुसूचित जाती-जमाती या जातिभेदाने ग्रसीत आहेत, परंतु या संदर्भात सुद्धा असा गैरसमज आहे की जाती या केवळ हिंदू धर्माशी निगडीत आहेत. सच्चर समिती अहवाल २००६ नुसार अनुसूचित जाती-जमातीचे विविध धर्मातील प्रमाण हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार भारतातील विविध आठ प्रमुख धर्मा मध्ये अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाण बुद्ध धर्मात अजा ८९.५० % व अज ७.४० %, ख्रिस्चन धर्मात अजा ९ % व ३२. ८०%, सिख धर्मात अजा ३०.७०% व अज .९०%, हिंदू धर्मात अजा २२.२०% तर अज ९.१०%, पारसी धर्मात अज १५.९०%, जैन धर्मात अज २.६०% आणि मुस्लिम धर्मात हेच प्रमाण अजा .८०% व अज .५०% एवढे आहे. या नुसार असे दिसून येते की भारतीय समाजव्यवस्थेत अनुसूचित जाती-जमातीचे कमी जास्त प्रमाणात सर्वच प्रमुख धर्मात एकूण वर्ष २००१ च्या जंगणणे नुसार भारतात अजा १६,६६,३५,७०० (१६.२३ %) आणि अज ८,४३,२६,२४० (८.१७%) म्हणजेच एकूण अजा/अज २४.४% एवढे आहे आणि जवळपास २५ टक्के समाज हा जातिभेदाणे ग्रसीत आहे. एवढेच न्हावे तर भारतीय व्यक्ती हा इतर देशात गेला तरी जाती या त्यांच्या सोबत जातात आणि ब्रिटन सारख्या देशांनी सुद्धा या करीता रेस रीलेशन्स अॅक्ट १९७६ आणि यूके समानता कायदा २०१० पारित केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग अहवाल २०१४-१५ पान क्र.१५६/१५७ नुसार अ.जा. व अ.ज. वरील अत्त्याचाराची राष्ट्रीय स्थिती जर बघितली तर वर्ष २०१४ मध्ये भांदवी सह अॅट्रॉसिटी अंतर्गत दोष सिद्धीचे एकूण प्रमाण २८.२ टक्के, निर्दोष सुटकेचे प्रमाण ७१.२ टक्के, प्रलंबित खटले १,२५,९५२, वर्ष २०१३ च्या तुलनेत ५० टक्के वाढ झाल्याचे दिसते. तसेच वर्ष २०१२ ते २०१४ मध्ये बलात्कार व अपहरण संहित दलित महिलावरील अत्त्याचाराचे प्रमाण ४१.६८ टक्के एवढे असल्याची नोंद आहे.
अत्याचाराच्या देशातील काही घटनांची परिस्थिति बघितली तर, मागील वर्षी उत्तर प्रदेश – हाथरस येथे दिनांक १४/०९/२०२० रोजी १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून अतिशय क्रूरपणे तिच्या पाठिची हाड मोडण्यात आली व जीभ सुद्धा कापण्यात आली. मरणासन्न सोडलेल्या या मुलीचा दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एवढेच न्हवे तर तिचा देह पोलिसांनी घाईघाईने मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळला. आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांचे कुटुंब वंचित ठेवण्यात आले. उत्तरप्रदेश शासन, पोलिस व शासकीय अधिकारीदेखील पीडित कुटुंबाबद्दल असंवेदनशील असल्याचे वृत्त होते. “या तरुणीवर बलात्कार झाला नसून मानेवर झालेल्या गंभीर जखमेमुळे मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नमूद आहे.” असे उत्तर प्रदेशाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलं होतं. हा रिपोर्ट पीडितेच्या कुटुंबीयांना मिळालेलाच न्हवता तरीही फोरन्सिक रिपोर्ट येण्याआधीच हाथरसच एस.पी. सांगत होते की तिच्यावर बलात्कार झालाच नाही. तसेच गॅंगरेप झालाच नाही हे सर्व स्तरावरून अमान्य करण्यात आले.
१ डिसेम्बर १९९७ रोजीच्या बहुचर्चित लक्ष्मणपुर बाथे नरसंहार मध्ये बिहार च्या जहानाबाद जिल्ह्यातील लक्ष्मणपुर बाथे गांवात सवर्ण जातिच्या रणबीर सेना गटाने ६० दलितांची निरघुण हत्त्या केली. यात पटना सत्र न्यायलयांने एप्रिल २०१० ला १६ आरोपिन्ना फशी आणि १० आरोपिन्ना जन्मठेप शिक्षा दिली परंतु मा. पटना उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोम्बेर २०१३ ला पुराव्या अभावी सर्वाना निर्दोष सोडले. तसेच भटनी टोला नरसंहार मध्ये सुकच बिहार च्या भोजपुर जिल्हयातील भटनी टोला या गवात सवर्ण जातिच्या रणबीर सेना गटाने दिनांक ११ जुलाई १९९६ रोजी २१ दलितांची निरघुन हत्त्या केली यात सत्र न्यायलयांने १२ मे २०१० ला ३ आरोपिन्ना फाशी आणि २० आरोपिन्ना जन्मठेप शिक्षा दिली परंतु मा. पटना उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०१२ ला पुराव्या अभावी सर्वाना निर्दोष सोडले.
अ.जा. व अ.ज. वरील अत्त्याचाराची महाराष्ट्रातील स्थितीवर लक्ष केंद्रित केले तर असे दिसून येते की, मे २०२१ पर्यंत तपासावर प्रलंबित एकूण गुन्हे ८२१, न्यायालयत प्रलंबित खटले १३०८७ आणि वर्ष २०२१ मध्ये मे अखेर पर्यंत एकूण दाखल गुन्हे २५७४ आहेत. मागील पाच वर्षात वर्ष निहाय दाखल गुन्हे जर बघितले तर , वर्ष २०१६ मध्ये एकूण दाखल गुन्हे २१५९, २०१७-२१५४, २०१८-२५०१, २०१९-२७१५, २०२०-३२५० एवढे आहेत. मागील ५ वर्षा मध्ये भांदवी सह अॅट्रॉसिटी कायदया अंतर्गत दोष सिद्धी चे एकूण प्रमाण ७ टक्के आहे. निर्दोष सुटकेचे प्रमाण ९३ टक्के तर ८७ टक्के खटले प्रलंबित आहेत. राज्याच्या गृह मंत्रालया नुसार वर्ष २०१५ मध्ये दलित महिलावरील बलात्काराच्या ३३१ घटना आणि खुनाच्या ९७ घटना नोंद आहे. वर्ष २०११-२०१६ मध्ये तेरा जिल्ह्यात एकूण ८६९८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर दलित मानवाधिकार कार्याकार्त्यावरील हल्ल्या मध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. अत्याचाराच्या महाराष्ट्रातील काही घटनांवर एक नजर टाकली तर, पुरोगामी महाराष्ट्राची जगभर मान खाली घालणारी घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड. दिनांक २९ सप्टेंबर २००६ रोजी भोंतमंगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर, रोशन या चार सदस्यांची निरघुण हत्या करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला ४६ आरोपींवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. हे प्रकरण स्थानिक भंडारा पोलिसांकडून सी.आय.डी. कडे वर्ग करणायात आले. चौकशीदरम्यान आरोपींची संख्या ४६ वरून ११ वर आली. भंडारा येथील जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. दास यांनी २० सप्टेंबर २००८ रोजी आठ आरोपींनी खून केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आणि इतर तिघांना निर्दोष ठरवण्यात आले. पण या प्रकरणात सुद्धा ॲट्रॉसिटीचं कलमाअंतर्गत शिक्षा झाली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जलदगती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले. परंतु १४ जुलै २०१० रोजी फाशीऐवजी आठ जणांना २५ वर्षांची जन्मठेप सुनावली. यातील दोघांचा मृत्यू झालाय तर सहा आरोपी नागपूच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सुरेखा भोतमांगे यांचे पती भैयालाल, सरकार आणि आरोपी यांनी वेगवेगळ्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. हे प्रकरण गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असून सुनावणीला आलेले नाही. न्यायासाठी त्यांनी तब्बल १० वर्षे लढा दिला. मात्र दुर्दैवाने या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच न्यायची वाट बघत अखेर खैरलांजी हत्याकांडातील पीडित आणि एकमेव साक्षिदार भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २० जानेवारी २०१७ रोजी निधन झाले. मागील दहा वर्षातील अशा अनेक अत्याचारच्या घटना आहेत ज्यामध्ये पीडित अजूनही न्यायची वाट बघत आहेत. त्यामध्ये २० वर्षीय विराज जगताप हत्याकांड पुणे (१० जून २०२०), शिरपुटी-वाशिम येथील दलितांवरील बहिष्कार (जून २०१८), १६ वर्षीय सनी साळवे हत्याकांड, धुळे (१८ एप्रिल २०१८), १७ वर्षीय स्वप्नील सोनावने हत्याकांड, नवी मुंबई (जुलै २०१६), १८ वर्षीय सागर शेजवळ हत्याकांड, शिर्डी –नाशिक (१६/०५/२०१५), १७ वर्षीय नितीन आगे हत्याकांड, खर्डा-अहमदनगर (२८/४/२०१४), २२ वर्षीय माणिक उदागे हत्याकांड, चिखली-हवेली-पुणे (१/५/२०१४), मानवाधिकार कार्यकर्ता चन्द्रकांत गायकवाड हत्याकांड, जांब-इंदापूर-पुणे(१२/२/२०१३), वाशीम जिल्ह्यातील आंबेडकर जयंती मिरवणुकीवरील दगडफेक (१४/४/२०१४), मुरबाड येथील आंबेडकर जयंती मिरवणुकीवरील दगडफेक (१४/४/२०१४), घाटकोपर मुंबई येथील रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड (११ जुलै १९९७) अश्या अनेक घटनांचा समावेश आहे.
या सर्व अत्याचाराची प्रमुख कारणे जर बघितली तर त्यामध्ये प्रामुख्याने असे दिसून येते की, जेव्हा दलित-आदिवासी कायदेशीर अधिकाराची मागनी करतात तेव्हा त्याला विरोध म्हणून अत्याचार केला जातो. जमीन, पाणी, रोजगार ई. संसाधनातील वाटा मागितल्यास, मनाप्रमाणे व्यवसाय केल्यास, सार्वजनिक उत्सव-समारंभात भाग घेतल्यास, स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराची मागणी केल्यास, मतदानाच्या अधिकाराचा मनाप्रमाणे वापर केल्यास, राजकीय प्रक्रियेत सहभाग घेतल्यास, जास्त शिकल्यास, चांगले राहिल्यास व चांगले कपडे घातल्यास, किंवा अंधश्रद्धा (करणी-कवटाळ) याला विरोध केल्यास तसेच अनेक घटनादत्त अधिकारांची मागणी केल्यास दलित-आदिवासी यांच्यावर अत्याचार होत असल्याचे दिसून येते.
अनुसूचित जाती जमाती वरील अत्याचार थांबावेत, तसेच त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती उंचविण्या करीत व जाती आधारित भेदभाव दूर करण्या करीता अनेक कायदे पारित करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतर तीन वर्षाने म्हणजे २६ जानेवारी १९५० ला राज्यघटना अमलात आली. संविधानाने सर्वांना समान हक्क बहाल केले व अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला. त्याकरिता अस्पृश्यता गुन्हेगारी कायदा, १९५२ अमलात आला. त्यालाच १९७६ माहीए काही दुरुस्त्या करून १९५५ चा नागरी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात आले. तरीही अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नाही, तत्कालीन अस्तित्वात असलेले कायदे व घटनात्मक तरतुदी दलित-आदिवासींना न्याय देण्यास अपुऱ्या आणि कुचकामी ठरल्या. याकरिता दिनांक ११ सप्टेंबेर १९८९ रोजी “अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) विधेयक” संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला व दिनांक ३० जानेवारी १९९० पासून तो अमलात आला. यामध्ये कालानुरूप बदल करून सुधारित अॅट्रॉसिटी कायदा २०१५ पारित करून २६ जानेवारी २०१६ पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला. सदर कायद्यातील विशेष तरतुदींची योग्यरित्या अंमलबजावणी व्हावी या करीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) नियमावली १९९५ व त्यात सुधारणा करून २०१६ ची नियमावली लागू करण्यात आली. या सुधारित कायद्यामध्ये अनेक नवीन गुन्ह्यासह भारतीय दंड संहिते अंतर्गत १० वर्ष पेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. कलम ४ मध्ये सुधारणा करून कर्तव्यातकसूर करण्याची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासकीय कार्यवाही व्यतिरिक्त न्यायालाईन कार्यवाहीचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. तसेच विशेष न्यायालय संदर्भात महत्वाची सुधारणा अशी की, अॅट्रॉसिटी केसेसचा जलद निपटारा करण्याकरिता ६० दिवसाच्या आत निकाल देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पिडीत-साक्षीदारांना अनेक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा घडल्यास आणि आरोपी पिडीताला ओळखत असल्यास तो गुन्हा जातीच्या कारणावरूनच घडला अश्या आशयाच्या गृहीताचा समावेश करण्यात आला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश श्री. व्ही.एस.शिरपूरकर यांनी दिलीप प्रेमनारायन तिवारी वि महाराष्ट्र राज्य(मनु/येस.सी.सी./१८८४/२००९) या खटल्यात दिलेल्या निर्णयामध्ये असे नमूद केले आहे की “जात ही अशी संज्ञा आहे की ज्याची जन्मतच व्यक्तीवर घट्ट पकड असते आणि मारणोपरांत सुद्धा सोडत नाही. सादर जात, धर्म व समाज या संकल्पनांची ही दुष्टपकड जारी पूर्णता अयोग्य असली तरीही हे च कटू सत्य आहे. ” जातीप्रथ ही भारतीय समाजमनात खोलवर रुजलेली असून यातूनच अस्पृश्यतेचा उगम झाला आहे आणि याचा प्रत्यय सर्वसामान्य व्यवहारात रोजच पहायला मिळतो. याच जाती आधारित दर्जा प्रदान करण्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला दलित आदिवासी यांनी विरोध केल्यास अत्याचार होत असल्याचे दिसून येत. भारतासारख्या प्रगत देशात दलित-आदिवासी यांच्यावरील अन्याय अत्याचाराचे आणि त्यांच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे प्रमुख कारण जातिभेद असल्याचे अनेक अभ्यासामधून समोर आले आहे.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या उद्देशीकेतच नमूद केल्याप्रमाणे सादर कायदा हा अनुसूचित जाती-जमातींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालणे, अत्याचार पिडीतांना पुनरस्थापित करणे आणि सादर अत्याचारांचे खटले स्वतंत्र विशेष न्यायालयामार्फत जलद गतीने नैसर्गिक न्याय देणे असा आहे. परंतु याच मूलभूत उद्देशाचे उल्लंघन प्रस्तुत न्यायालाईन व्यवस्थेत अतिशय शिस्तबद्ध होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तांत्रिक बाबींवर आधारित नकारात्मक निर्णयावरून स्पष्ट जाणवते.
दिनांक २० मार्च २०१८ रोजी डॉ.सुभाष काशिनाथ महाजन वि.महाराष्ट्र राज्य (फौजदारी अपिल क्र.४१६/२०१८) या केस मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात एक महत्वपूर्ण आणि निराशाजनक निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निकाला नुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने पूर्वचौकशी करावी. सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्या आधी नियुक्ती अधिकारी किंवा इतर आरोपी करिता पोलिस अधिक्षकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच अॅट्रॉसिटी च्या गुन्ह्यात न्यायालय अटकपूर्व जामिन देवू शकते असे निर्देश देण्यात आले होते. या निकलामुळे संपूर्ण देशात अनुसूचित जाती-जमाती समुदायामध्ये प्रचंड नैराष्य पसरले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे अॅट्रॉसिटी कायदा पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. त्यामुळे केंद्र शासनाने अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारना करून अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१८ पारित करुन कलम १८ऐ चा समावेश केला व कायदा पूर्ववत केला. या सुधारित कायद्याच्या कलम १८ऐ च्या घटनात्मक वैधते संदर्भात श्री. शरद चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. परंतू यापूर्वी रामकृष्ण बलोतिया विरुध्द मध्यप्रदेश या प्रकरणात १९९५ ला मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. सुजाता मनोहर यांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १८ वैध आहे व या कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामिन देता येणार नाही असा निर्णय दिला आहे. दिंनाक १० फेब्रुवारी २०२० रोजी तिन सदस्यांच्या संवैधानिक खंडपीठाचे जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस विनीत सरन आणि जस्टिस एस.रविन्द्र भट यांनी या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. या निकाला नुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने पूर्वचौकशी करण्याची काहीही गरज नाही. सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्या आधी नियुक्ती अधिकारी किंवा इतर आरोपी करिता पोलिस अधिक्षकाची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसेच अॅट्रॉसिटी च्या गुन्ह्यात न्यायालय अटकपूर्व जामिन देवू शकत नाही असे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अतिशय स्वागतार्ह असाल तरीही केंद्र व राज्य शासनाने या निर्देशांचे काटेकोर पणे पालन करून अनुसूचित जाती-जमाती समुदायाचे अधिकार सुनिश्चित करण्याची नितांत गरज आहे. कारण अजूनही न्यायालय हे सर्रास अटक पूर्व जामीन मंजूर करत आहे किंवा या तरतूदिला बगल देण्या करीता ततपुरता अन्तरिम जामीन देवून अर्ज अनेक महीने प्रलंबित ठेवला जातो.
दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.डॉ.डी.वाय.चंद्रचूड आणि एम.आर.शाह यांच्या खंडपिठाने आंध्र प्रदेशातील अंध दलित मुलीवरील बलात्काराच्या खटल्यातील अपिलात अॅट्रॉसिटी कायद्यातील ३(२)(५) या कलमाचा अर्थ लावतान्ना एखादा भारतीय दंड सहिंतेच्या दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा जातीच्या कारनावरुण झाल्या शिवाय आपोआप अॅट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही असे म्हटले आहे. दिनांक ३१मार्च २०११ रोजी आंध्र प्रदेश येथील २० वर्षाच्या एका अंध दलित मुलीवर बलात्कार झाला होता आणि या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने दिनांक १९ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीला भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंड तसेच अॅट्रॉसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार सुद्धा ,जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा ठोठावली होती. मा.आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीची अपील फेटाळत शिक्षा कायम केली. या विरोधातिल अपिलात मा.सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा कायम केली परंतू अॅट्रॉसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार असलेली शिक्षा रद्द केली
दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अनुसुचित जाती/ अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित कायदा २०१८ कमकुवत करणारा आहे. सदर कायद्यातील ३(२)(५) कलमाचा गैरवाजवी व मर्यादित अर्थ लावून आरोपींना अभय देणारा हा निकाल दुर्दैवी आहे. अॅट्रॉसिटी कायद्या च्या कलम ३(२)(५) नुसार गुन्हा जातीच्या कारणावरून झाला पाहिजे, परन्तु याच कायद्याच्या कलम ८(क) मधिल गृहीतानुसार आरोपीला पिडीताची जात माहिती असेल तर तो गुन्हा जातीच्या कारणावरूनच घडला आहे, या ग्रुहिताचा विचार न करता तर्तुदिचा मर्यादित अर्थ लावण्यात आला आहे. या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यकआहे. कायाद्याचा अर्थ लावण्याच्या सुवर्ण नियम (गोल्डन रूल) या नियमा नुसार कुठल्याही कायाद्याचा अर्थ काढतांना कायदा पूर्णपणे वाचला पाहिजे आणि उद्दिष्ट व ग्रुहितांचा विचार केला पाहिजे. असे असतांना भारतीय समाजाच्या अविभाज्य दुर्लक्षित घटकाच्या संरक्षनाकरिता असलेला घटनात्मक सामाजिक कायदा म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याचा वारंवार मर्यादित अर्थ लावणे हा त्यांच्यावारिल दुहेरी अन्याय आहे का?
माननिय सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या तांत्रिक बाबींवर भर देवून दिलेल्या नकारात्मक निकालांमुळे देशात अॅट्रॉसिटीच्या केसेस मधील शिक्षेचे प्रमाण कमी होत आहे का? असा प्रश्न पडतो. कारण या आधी सुद्धा असे अनेक निवाडे समोर आले आहेत. दिनांक १९ जानेवारी २०११ रोजी मा. पटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती रेखा दोशीत व न्या. श्री. ज्योती यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार वर्ष १९९५ पासून तर ९ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या हजारो अॅट्रॉसिटीच्या केसेस रद्दबाद करण्याचा आदेश बिहार सरकारला दिला होता. याचे मुख्य कारण जर आपण बघितले तर, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तपासाचे अधिकार केवळ पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला असतांना दिनांक ३ जून २००२ रोजी बिहार सरकारने निर्देशित केलेल्या एका आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी कमी असल्यामुळे अॅट्रॉसिटीच्या केसेस मध्ये तपास करण्याचा अधिकार पोलिस इंस्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याला बहाल केला होता. त्यामुळे तपास योग्य अधिकाऱ्याने केला नाही या तांत्रिक कारणावरून हजारो अॅट्रॉसिटीच्या केसेस रद्दबाद करणे व अत्याचार पिडीतांना नैसर्गिक न्याय नाकारणे कितपत योग्य आहे? अॅट्रॉसिटी नियमावलीत तसे प्रवाधान करण्याचा उद्देश म्हणजे सादर प्रकरणात अधिकारी व पिडीतांवर स्थानिक दबाव न राहता योग्य व नि:पक्ष तपास व्हावा असा आहे. परंतु काही कारणास्तव जर तसे होत नसेल तर याचा अर्थ ती अॅट्रॉसिटी नाही हे नक्कीच होणार नाही.
याच संदर्भात दिनांक ५ जानेवारी रोजी कैलास वि महाराष्ट्र राज्य (फौजदारी याचिका क्र. ११/२०११, परिछेद १०) या महाराष्ट्रातील केस मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने सादर तांत्रिक बाबीवर खरडून टीका केली होती. या खटल्यातील फिर्यादीचे जातीचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे व तपास योग्य अधिकाऱ्याने केला नाही या तांत्रिक कारणामुळे मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीची अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमाअंतर्गत असलेली शिक्षा रद्द केली होती. यावर माननिय सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत सादर बाबी या केवळ तांत्रिक स्वरूपाच्या असून फक्त यावरून आरोपींना निर्दोष सोडणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले होते. तरीही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या दोन केवळ आठवड्यानंतर मा. पटना उच्च न्यायालयाचा तांत्रिक बाबींवर आधारित हजारो अॅट्रॉसिटीच्या केसेस रद्द करण्याचा निर्णय हा फारच विरोधाभासी आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने “आरुमुगम सरवई वि. ”तामिळनाडू राज्य, फौजदारी अपील क्रमांक ९५८-५९/२०११(६) एस.सी.सी.४०५” या निवाड्याच्या परिच्छेद १७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्या करिता ठोस पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत. अश्या प्रकारच्या घटना घडल्यास दोषींवर फौजदारी कार्यवाही करण्या व्यतिरिक्त राज्य सरकारला संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर संबंधित अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर सुद्धा दोषारोपपत्र दाखल करावीत व प्रशासकीय कारवाही सुद्धा करावी असे निर्देश देण्यात आले आहे. या खटल्यात दिलेल्या निर्देश तत्वांची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही असे दिसून येते.
मा.सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकारांचे मुख्य संरक्षक आहेत असे मानले जाते आणि अनेक उदारमताने दिलेल्या निवाडयात ते सिद्ध झाले आहे मग दलित-आदिवासिंच्या अधिकारा बाबत मर्यादित दृष्टिकोण का? अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात अनेक टिका टिपण्णी होत असून न्यायालयात अवास्तव याचिका दाखल होत आहेत, ,हे टाळण्याकरिता व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१५ या कायद्याचे न्यायिक पुनरवलोकना पासून सरंक्षण करण्याकरीता भारतीय संविधानाच्या अनुसूची-९ मध्ये अॅट्रॉसिटी कयाद्याचा समावेश करायला हवा. अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात भारतीय न्याय व्यवस्थेच्या निकालांच्या गुणवत्तेत वाढ झाल्यास त्याचा चांगला परिणाम इतर खालच्या स्तरावरील न्यायालाईन प्रक्रियेवर होऊ शकतो. वरिष्ठ न्यायलयांनी इतर सामाजिक कायद्यांचे अर्थ लावतात असेच उदार अर्थ लावून अॅट्रॉसिटीच्या खटल्यांचे निर्णय दिल्यास शिक्षेच्या प्रमाण मध्ये सुद्धा नक्कीच फरक पडेल…