फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – फोंडशिरस -सदाशिवनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत तीन कोटी रुपये इस्टिमेट बजेटच्या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. हे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.रस्ता पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्या मध्ये खड्डे पडले असून नवीन रस्ता हातानी उकरत आहे.या रस्त्यामध्ये डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या संदर्भात फोंडशिरस येथील ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम सुरू असताना उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या पाठी मागचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यासाठी अधिकारीच पाठीशी घालतात असे ग्रामस्थांकडून आरोप केले जात आहेत. मा.उप अभियंता यांना इस्टिमेट प्रमाणे काम झाले का हे विचारलं असता उपअभियंता व संबंधित अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.यासंदर्भात चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व डोळेझाक अपने बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार व धिकार्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 5 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात,जमीर मुलानी ग्रामपंचायत सदस्य दिनेश भोसले यांनी मा.उपविभागीय प्रांत अधिकारी ,मा. तहसीलदार माळशिरस, अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे.या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काल एका चार चाकी वाहनाचा अपघात सुद्धा झाला आहे. फोंडशिरस सदाशिवनगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात वर्दळ असते विद्यार्थी,शेतकरी व अनेक लोक या रस्त्याने ये-जा करतात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा निधी येत असतो व त्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन कामे निकृष्ट दर्जाचे होतात याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ही दिसून येत आहे.