दहिगाव येथे शिवकालीन ऐतिहासिक वेस लोकार्पण सोहळा संपन्न
(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)
दहिगाव तालुका माळशिरस येथे शिवकालीन ऐतिहासिक वेस नूतनीकरण लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच याप्रसंगी नूतन सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दहिगाव ला ऐतिहासिक वारसा लाभला असून शिवकालीन इतिहासात कसबे दहिगाव अशी ओळख असून, जैन मुनी महतीसागर महाराज यांचे वास्तव्य लाभलेले व त्यांच्या संकल्पनेतून लाभलेले ऐतिहासिक मंदिर उभे असलेले गाव तसेच निंबाळकर राजेंची जहागिरी व राजवाडा यांचा वारसा लाभलेल्या दहिगाव हे ऐतिहासिक शिवकालीन संस्थानिक गाव आहे. गावामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोक राहतात. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही दहिगावकर ही संकल्पना अस्तित्वात आली व याच संकल्पनेतून नामशेष होत असलेली ऐतिहासिक वेस दगडी बांधकाम करून त्याचे नूतनीकरण करून त्यावेसला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले व ती वेस लोकार्पण करण्यात आली. हा कार्यक्रम दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर घेण्यात आला होता.या कार्यक्रमास गावातील युवक प्रतिष्ठित व्यक्ती व गावकऱ्यांचा मोलाचा सहभाग दिसून आला. तसेच या कार्यक्रमास गावातील आजी-माजी शासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग,माजी सैनिक,शिक्षक,ग्रामस्थ युवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.