बेकायदा पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सहायक आयुक्तांचा आडता हात. भाजपच्या अशोक शेळके यांचा गंभीर आरोप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नालासोपारा, बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर, २०२० :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती – ब चे सहायक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून अनधिकृतपणे पाणी विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या अशोक शेळके यांनी केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या बोगस प्लांट चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बेकायदेशीपणे चालविण्यात येत असलेले गोरखधंदे सीलबंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुरु झाली काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन बोगस प्लांट सील करण्यात आले. मात्र प्रभाग समिती – बी चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून कारवाई करण्यास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याची बाब अशोक शेळके यांनी समोर आणली आहे.
प्रभाग समिती – ब मध्ये एकूण ६० बोगस प्लांट आढळून आले. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ३ प्लांट वर तर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी १५ बोगस प्लांट असे ६० पैकी केवळ १८ बेकायदा प्लांट सील करण्यात आले. उर्वरित ४२ प्लांट वरील कारवाई चे पुढे काय झाले असा सवाल अशोक शेळके यांनी केला आहे. १३ तारखेनंतर आज ऑक्टोबर महिना संपत आला असताना पुढे एकही बेकायदा प्लांट वर कारवाही का झाली नाही, सदरची कारवाई न करण्यामागे सहाय्यक आयुक्तांचा नेमका हेतू काय आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.
याप्रकरणी आयुक्त महोदयांनी व्यक्तिशः लक्ष घालावे अन्यथा कारवाईस होत असलेल्या दिरंगाईबद्दल राज्य शासनाकडे पुन्हा तक्रार करावी लागेल असा इशारा अशोक शेळके यांनी दिला आहे.

You may have missed